झारखंडमधील लोहारदगा येथे मटार खाल्ल्याने एका दीड वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हिरव्या वाटाण्याचा दाणा मुलाच्या श्वासनलिकेत अडकल्याने मुलाचा मृत्यू झाला. कारो पोलीस स्टेशन हद्दीतील गुडी करंजा टोली येथे ही घटना घडली.
खुदी ओरांव यांचा दीड वर्षांचा मुलगा शिवम ओरांव याला गुरुवारी त्याच्या कुटुंबाने शेतामध्ये नेलं होतं. तिथे खेळत असताना त्याने हिरव्या वाटाण्याचं एक रोप उपटून घरी आणले. चिमुकल्याने खेळताना मटारचा दाणा तोंडात टाकला. जेव्हा मुलाच्या घशात दाणा अडकला तेव्हा तो वेदनेने तळमळू लागला. प्रकृती बिघडत असल्याचं पाहून कुटुंबीयांनी मुलाला उपचारासाठी रुग्णालयात नेलं जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.