प्रार्थना स्थळ आणि मशिदींवरील भोंग्यामुळे ध्वनी प्रदूषण होत असल्याचा मुद्दा भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सुचनेद्वारा मांडला. या लक्षवेधीला उत्तर देत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रार्थना स्थळावरील भोंग्यांचा विषय मांडत असताना रोज सकाळी वाजणाऱ्या भोंग्याचे काय करायचे? असे सांगून संजय राऊत यांना टोला लगावला.
मुख्यमंत्र्यांनी संजय राऊत यांचे नाव घेतले नसले तरी संजय राऊत यांच्या रोजच्या पत्रकार परिषदावर याआधीही फडणवीसांसह अनेक महायुतीच्या नेत्यांनी टीका केली आहे. संजय राऊत रोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर कधी कधी स्वकीयांवरही टिका करत असतात. त्यानंतर दिवसभरात त्यावर अनेक प्रतिक्रिया व्यक्त होत असतात. यावर महायुतीच्या अनेक नेत्यांनी सकाळचा भोंगा बंद झाला पाहिजे, अशी गमतीत प्रतिक्रया दिली होती. याचाच धागा पकडत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संजय राऊत यांना सभागृहात टोला लगावला.