नवी दिल्ली: नुकत्याच पार पडलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने दमदार कामगिरी करत तब्बल २७ वर्षांनी सत्तेत पुनरागमन केले. त्यानंतर दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्र्यांबद्दलचा सस्पेन्स आज संपण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पार्टी त्यांच्या वरिष्ठ नेतृत्वासोबत विधिमंडळ बैठक घेणार आहे, ज्यामध्ये मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्र्यांची नावे निश्चित केली जाणार आहेत. दरम्यान, दिल्लीच्या नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी उद्या, २० फेब्रुवारी रोजी होणार आहे.
दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी समारंभ रामलीला मैदानावर होणार आहे. २५,००० ते ३०,००० हून अधिक लोक या शपथविधीसाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याव्यतिरिक्त, भाजपाचे खासदार तसेच एनडीएचे वरिष्ठ नेते देखील उद्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.