केदार शिंदे यांनी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून त्यांनी लग्नाच्या वाढदिवसाचं निमित्त साधत त्यांच्या पत्नीसाठी खास पोस्ट लिहिली आहे. जिथं त्यांनी त्यांच्या मनातल्या भावना अगदी सहजपणे मांडल्या. शेअर केलेल्या पोस्टमध्ये ते एका चित्रपटाच्या सेटवर असल्याचं दिसत असून, एखाद्या महत्त्वाच्या मुद्द्यावर त्यांची पत्नीसोबत चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळालं.
पत्नीनं दिलेली साथ किती महत्त्वाची होती, याबाबत सांगताना केदार शिंदे लिहितात, ‘असंख्य चांगले फोटो आहेत. पण आज लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हाच फोटो टाकावासा वाटला. तू गेली २९ वर्षे सोबत आहेस. तू माझ्या अडचणीच्या काळात खंबीरपणे उभी राहतेस. याही फोटोत माझ्या चेहऱ्यावर जे frustrating भाव आहेत आणि तुझ्या चेहेऱ्यावरचा जो शांत भाव आहे, तो आपल्या दोघांच्या स्वभावातला फरक सांगून जातो. मी अजूनही वेड्या कल्पनांच्या मागे धावतो आणि तू नेहमीच माझ्या वेडेपणाला साथ देतेस. यशात तू कधीच पुढे येत नाहीस. अपयशात मात्र ढाल होऊन संरक्षण करतेस. मी मात्र अजूनही तुला स्थिरता देऊ शकलेलो नाही. तू मात्र माझ्या अस्थिरतेला सवयीचं करून घेतलंयस. नेहमीच अशा पोस्टमधून तुला खात्री देतो. पण पुर्ण काही करत नाही. तरीही पुढच्या माझ्या वेडेपणात तू अशीच सोबत असशील, हे ठाऊक आहे. तेव्हाही असाच working फोटो कुणीतरी काढेल. पण तो टाकून पुन्हा हेच सगळं मी लिहू नये, हीच स्वामी चरणी प्रार्थना.’