महाराष्ट्रातील मासेमारी विभागाने मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांसाठी विशेष सूचना जारी केली आहे. अरबी समुद्रामध्ये तेल उत्खनन चालतं अशा ठिकाणी तसेच संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या समुद्रातील भागांमध्ये म्हणजेच नौदलाच्या भागात मासेमारीसाठी जाऊ नये असा इशारा जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या ८७७.९७ किलोमीटर लांबीच्या समुद्रकिनाऱ्यासाठी हा नियम लागू असणार आहे, असंही जाहीर करण्यात आलं आहे.
भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाने मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांबरोबर एक विशेष बैठक घेतली. मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांबरोबरच, मासेमारी विभाग, कोस्टल पोलीस, सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरीटी फोर्स आणि कोस्ट गार्डचे अधिकारीही या बैठकीला उफस्थिती होते. कोळी बांधवांनी मासेमारीसाठी संवेदनशील ठिकाणी जाऊ नये असं या बैठकीत नमूद करण्यात आलं.