मोदी सरकारकडून एक महत्त्वाची योजना अचानक बंद

केंद्र सरकारने एक महत्त्वाची योजना बंद केली आहे. जातीय भेदभाव कमी करून सर्व धर्मात समानता यावी, या दृष्टिकोनातून सुरू करण्यात आलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह योजना बंद करण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनच्या वतीने २०१४-१५ पासून ही योजना सुरू होती. परंतु, कुठलेही कारण न देता ही योजना बंद करण्यात आली. विशेष म्हणजे, राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडे या योजनेसाठी अर्ज करणाऱ्यांना योजना बंद झाल्याचे थेट पत्रच दिले आहे.

केंद्र सरकारच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह योजनेच्या माध्यमातून आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्यास २ लाख ५० हजार रुपये इतके अर्थसहाय्य दिले जात होते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आंतरजातीय विवाहित दाम्पत्यापैकी एक व्यक्ती अनुसूचित जातीची असणे आवश्यक होते. विवाहाच्या एक वर्षाच्या आत परिपूर्ण प्रस्ताव सादर करणे व राज्याच्या समाजकल्याण विभागाकडे अर्ज करणे आवश्यक होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनच्या संकेतस्थळावर आजही ही योजना सुरू असल्याचे दर्शवले जाते. परंतु, पात्र अर्जदारांना समाज कल्याण विभागाकडून पत्र पाठवून ही योजना बंद झाल्याचे कळवण्यात आले आहे. तसेच सामाजिक न्याय आयुक्तालयानेही सर्व जिल्ह्यांच्या समाज कल्याण अधिकाऱ्यांना ही योजना बंद झाल्याचे पत्र पाठवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here