सोमवारी संध्याकाळी दुबईहून आलेली एक अनोळखी महिला अभिनेता आदित्य रॉय कपूरच्या घरी बिनधास्तपणे पोहोचली. आदित्य घरी नसतानाही तिने भेटवस्तू आणि कपडे देण्याचा बनाव करत घरात प्रवेश मिळवला.
सायंकाळी सुमारे ६ वाजता आदित्यच्या घरात काम करणाऱ्या संगीता पवारने दरवाजा उघडला. तेव्हा समोर एक महिला उभी होती. ती कपडे आणि गिफ्ट्स देण्यासाठी आली आहे असे सांगू लागली. यामुळे संगीता पवारने तिला घरात प्रवेशही दिला. मात्र, नंतर जेव्हा तिने विचारले की अपॉइंटमेंट घेतली आहे का, तेव्हा त्या महिलेने खोटे सांगितले की, तिची आदित्यसोबत ६ वाजता भेट ठरलेली आहे.
थोड्याच वेळात आदित्य घरी पोहोचला. संगीता पवारने त्याला संपूर्ण माहिती दिली. तो त्या महिलेला ओळखत नाही आणि त्याच्या कोणत्याही अपॉइंटमेंटची माहिती नाही असे आदित्यने संगीताला स्पष्ट सांगितले. हे ऐकताच संबंधित महिला आदित्यजवळ जाण्याचा प्रयत्न करू लागली. संगीता आणि इतर कर्मचाऱ्यांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. वारंवार सांगूनही ती बाहेर जाण्यास तयार नव्हती, त्यामुळे शेवटी पोलिसांना कळवण्यात आले.
खार पोलिसांनी घटनास्थळी येऊन महिलेविरुद्ध IPC कलम 448 (घरात घुसखोरी) अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तिची चौकशी केली. तेव्हा तिने स्वतःचे नाव गजाला झकारिया सिद्दीकी असल्याचे सांगितले आणि ती दुबईतील लिवान येथील रहिवासी असल्याची माहिती दिली. मात्र, ती अभिनेता आदित्य रॉय कपूरला का भेटायला आली होती, याचे कोणतेही ठोस कारण तिने दिले नाही.
एका पोलिस अधिकाऱ्याच्या मते, ‘महिलेच्या वर्तनावरून तिच्या हेतूंबाबत शंका निर्माण झाली असून प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.’ अद्याप आदित्य रॉय कपूरकडून या प्रकरणावर अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. ही घटना अभिनेता सलमान खानच्या घरात घुसण्याचा प्रयत्न झाल्यानंतर काहीच दिवसांनी घडल्यामुळे मुंबईतील सेलिब्रिटी सुरक्षा यंत्रणेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.