बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीमुळे वातावरण तापलेलं असताना अजून एका नव्या पक्षाची भर पडली आहे. बिहारचे प्रसिद्ध माजी आयपीएस अधिकारी व ‘सिंघम’ अधिकारी अशी ओळख असलेले शिवदीप लांडे यांनी मंगळवारी राजकारणात प्रवेश केला. लांडे यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश केला नसून, त्यांनी स्वत:चा नवीन राजकीय पक्ष ‘हिंद सेना’ स्थापन करण्याची घोषणा केली आहे. एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेऊन लांडे यांनी ही माहिती दिली.
या नव्या पक्षाबाबत लांडे यांनी सांगितले की, ‘आपला पक्ष राष्ट्रवाद, सेवा आणि समर्पणाच्या तत्त्वांवर काम करेल आणि बिहारमधील लोकांचा आवाज बनण्याचा प्रयत्न करेल. १८ वर्षे बिहारची पोलिस गणवेशात सेवा केल्यानंतर एका नवीन भूमिकेत लोकांसमोर यायचे आहे. हिंद सेना पक्ष बिहारचे परिवर्तन घडवून विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी काम करेल’. 1996 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी लांडे गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पोलिस सेवेतून राजीनामा दिला होता. स्पष्टवक्तेपणा आणि कर्तव्यदक्ष प्रतिमेसाठी ओळखले जाणारे लांडे बिहारमध्ये ‘सिंघम’ आणि ‘सुपरकॉप’ अशा नावांनी ओळखले जातात. पाटणा, पूर्णिया, अररिया आणि मुंगेर आदी जिल्ह्यांत पोलिस अधीक्षक असताना त्यांनी गुन्हेगारांवर कडक कारवाई केली होती.
बिहार विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे सांगत लांडे म्हणाले, आयपीएस नोकरी सोडल्यानंतर त्यांना राज्यसभेवर पाठवण्यापासून ते मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार बनवण्यापर्यंतच्या ऑफर आल्या. पण त्यांनी त्या सर्व नाकारल्या. तरुणांची स्थिती आणि दिशा बदलण्यासाठी ते नवा पक्ष स्थापन करत आहेत.