मैत्रिणीने मैत्रिणीचाच केला घात, नशेचे इंजेक्शन देत मित्रांना करायला लावला सामूहिक बलात्कार

मैत्रिणीनेच तरुणीचा घात केल्याची माहिती समोर आली आहे. नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीला घरात डांबून ठेवत तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. टिटवाळाजवळील बल्याणी परिसरात ही घटना घडली आहे. २१ वर्षीय तरुणीचा आजीसोबत घरात वाद झाल्याने ती घर सोडून कामावर ओळख झालेल्या मैत्रीणीच्या घरी काही दिवस राहत होती. मात्र या मैत्रिणीनेच तिचा गैरफायदा घेत दुसऱ्या मैत्रिणीच्या मदतीने या तरुणीला नशेचे इंजेक्शन आणि ड्रग्ज पाजून महिनाभर कोंडून ठेवले. तर, मैत्रिणीच्या ओळखीतील चार ते पाच जणांनी तिच्यावर महिनाभर बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून टिटवाळा पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरु केला आहे. शबनम, जीनत, गुड्डू, गुलफाम, लियाकत, अली ईराणी आणि एक अनोळखी इसम अशी या आरोपींची नावे आहेत.

१९ मार्चला तरुणीचे आजी बरोबर भांडण झाल्याने तिने रागाच्या भरात घर सोडले होते. आपल्या बरोबर काम करणारी मैत्रीण जिनत हिच्या बल्याणी येथील घरी गेली. तर दुसरी मैत्रीण शबनम तिच्याच शेजारी राहत असल्याने सदरची तरुणी कधी जीनतच्या तर कधी शबनमच्या घरी राहत होती. १० दिवसानंतर तिने आपण घरी जात असल्याचे मैत्रीणीना सांगताच त्या दोघींनी संगमत करून आपला मित्र गुड्डू यास चारचाकी गाडी घेऊन बोलावले. गुड्डू आणि त्याच्याबरोबर तरुणीच्या ओळखीचा असलेला गुलफाम असे दोघे गाडी घेऊन आल्यानंतर शबनम आणि जीनत यांनी या तरुणीला घरी सोडण्याच्या बहाण्याने गाडीत बसवले. मात्र तरुणीला घरी न सोडता तिला एनआरसी कंपनीच्या मागे असलेल्या चाळीत चाळीचे काम दाखविण्याच्या बहाण्याने नेले. तिथे नेल्यानंतर शबनमने या तरुणीच्या मानेवर इंजेक्शन देत तिला बेशुद्ध केले.

बेशुद्ध अवस्थेतच तिला रामबाग येथील लियाकतच्या रूम मध्ये सोडण्यात आले. तिथे लियाकत याने तिच्यावर ती बेशुद्ध असतानाच बलात्कार केल्याचा आरोप या तरुणीने तक्रारीत केला आहे. सलग चार ते पाच दिवस आपण शुद्धीवर येताच पुन्हा आपल्याला नशेचे इंजेक्शन देत आपल्यावर बलात्कार केल्याचे या तरुणीचे म्हणणे आहे. आपल्याला घरी जाऊ देण्याचू विनंती केल्यानंतर या पाच जणांनी आंबिवली येथील अली इराणी याला बोलावून घेत मला तक्रार केल्यास फाशी देण्याची तसेच घरच्यांना मारण्याची धमकी देत आजी विरोधात खोटी तक्रार देण्यास भाग पाडले. यानंतर या तरुणीला सातत्याने नशेचे औषध देत कधी आंबिवली येथील चाळीत तर कधी रामबाग येथील लियाकतच्या घरी नेत तिच्यावर सातत्याने अत्याचार केले जात होते. दरम्यान ३ मे रोजी रात्री १२ वाजता आंबिवली येथील चाळीत तरुणी एकटीच असताना शुद्धीवर येताच तिने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला मात्र दरवाजाला कुलूप असल्याने तिने खिडकीतून जोरजोरात रडून आपल्याला बाहेर काढण्याची विनंती केल्यानंतर एका व्यक्तीने दरवाजाचे कुलूप तोडून तिला तिथून बाहेर काढत तिच्या आजीच्या घरी सोडले. तब्बल महिनाभर या तरुणीवर सातत्याने अत्याचार होत असल्याने शरीराने आणी मनाने पूर्णपणे खचलेल्या या तरुणीला आजीने धीर दिल्यानंतर मंगळवारी शबनम, जीनेत, गुड्डू, गुलफाम, लियाकत, अली ईराणी याच्यासह आणखी एका अनोळखी इसमाविरोधात टिटवाळा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here