मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि वाहतूक (बेस्ट) प्रशासन एसी आणि नॉन-एसी बसेसचे किमान भाडे कमी करण्याचा विचार करत आहे. 3 किमी पर्यंतच्या लहान मार्गांवर, एसी बसेसचे किमान भाडे आता 12 रुपयांऐवजी 9 रुपये असू शकते. तर नॉन-एसी बसेसचे किमान भाडे 10 रुपयांवरून 7 ते 8 रुपये केले जाऊ शकते.
अलीकडेच बस भाड्यात वाढ झाल्यानंतर मोठ्या संख्येने कमी अंतराचे प्रवासी शेअर ऑटोकडे वळले आहेत. त्यामुळे बेस्टकडून हे पाऊल उचलले जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
बेस्टचे महाव्यवस्थापक एसव्ही आर श्रीनिवास यांनी यासंदर्भात महत्वाची अपडेट दिली आहे. ‘बेस्ट बसची भाडे व्यवस्था अधिक लवचिक करण्यासाठी आम्ही नवीन स्लॅब जोडण्याची शक्यता विचारात घेत आहोत. यामध्ये, ऑटोचे स्पर्धात्मक भाडे देखील विचारात घेतले जाईल’, असे ते म्हणाले.