अहमदाबादमधील विमान दुर्घटनेत विमानातील सर्व ठार झाले असताना, आश्चर्यकारपणे फक्त रमेश विश्वासकुमार हा एकमेव प्रवासी वाचला आहे. यानंतर अनेकजण हा चमत्कार असल्याचं म्हणत आहेत. तर अनेकांनी हे कसं काय शक्य झालं? असा प्रश्न सतावत आहे. या प्रश्नाचं उत्तर स्वत: रमेश विश्वासकुमारने दिलं आहे. दरवाजा तुटल्याने त्या जागेतून मी बाहेर उडी मारली असं त्याने डीडी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
“सर्व काही माझ्या डोळ्यांसमोर झालं. मी त्यातून जिवंत कसा वाचलो यावर माझाही विश्वास बसत नाही आहे. थोड्या वेळासाठी आपलाही मृत्यू होईल असं मला वाटलं होतं. पण डोळे उघडल्यानंतर मी जिवंत असल्याचा भास झाला. मी सीटचा बेल्ट काढण्याचा प्रयत्न केला आणि निघालो. माझ्या डोळ्यांसमोर एअर होस्टेस आणि इतरजण जळाले,” असं रमेशने सांगितलं.
“टेक ऑफ झाल्यानंतर 5-10 सेकंदासाठी विमान अडकलं होतं. नंतर लाईट सुरु झाल्या. विमान उडावं यासाठी प्रयत्न होत होते. पण विमान हॉस्टेलवर पडलं. माझ्या डोळ्यांसमोर झालं,” असा खुलासा त्याने केला.
“मी ज्या बाजूला होतो ती बाजू हॉस्टेलवर लँड झाली नाही. तळमजल्यावर माझी बाजू लँड झाली होती. मी जिथे लँड झालो, ती खालची बाजू होती आणि थोडी जागा होती. दरवाजा तुटल्यानंतर जागा दिसली तर मी निघण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या बाजूला भिंत असल्याने कोणी निघू शकलं नसणार. मी कसं वाचलो हे मलाच माहिती नाही. आगीमुळे माझा डाव हात भाजला. नंतर मला रुग्णवाहिकेतून घेऊन आले,” अशी माहिती त्याने दिली आहे.