युक्रेन व रशियामध्ये चालू असलेलं युद्ध रोखण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रयत्न करत आहेत. याचाच भाग म्हणून युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी शुक्रवारी (२८ फेब्रुवारी) व्हाउट हाऊसला भेट दिली होती. या भेटीदरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झेलेन्स्की यांची जोरदार वाद झाल्याचा पाहायला मिळाला. दोघांमध्ये संभाषण चालू असताना ट्रम्प यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष जो बायडेन यांचा मूर्ख अध्यक असा उल्लेख केला. दरम्यान, ट्रम्प व झेलेन्स्की यांच्यातील वादाचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. यावर जगभरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. युक्रेनचे शत्रूराष्ट्र म्हणजेच रशियाने देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.
रशियाने या बाचाबाची प्रकरणावर म्हटलं आहे की “झेलेन्स्की यांना जे मिळायला हवं होतं तेच मिळालं”. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे, “आम्हाला प्रश्न पडला आहे की झेलेन्स्की ज्या पद्धतीने ट्रम्प यांच्याशी बोलत होते ते पाहून ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांना मारण्यापासून स्वतःला कसं रोखलं?”
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया जखारोव्ह यांनी टेलिग्रामवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की व्हाइट हाऊसमध्ये झेलेन्स्की ट्रम्प यांच्यासमोर असत्य कथन करत होते. त्यांची खोटी वक्तव्ये ऐकून ट्रम्प व उपाध्यक्ष जे. डी. व्हॅन्स यांनी झेलेन्स्की यांना मारलं कसं नाही याचं आम्हाला नवल वाटतंय. दुसऱ्या बाजूला रशियाचे माजी अध्यक्ष दिमीत्री मेदवेदेव यांनी देखील या घटनेवर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. मेदवेदेव म्हणाले, झेलेन्स्की व युक्रेनला ज्या गोष्टीची गरज होती तेच अमेरिकेने त्यांना दिलं आहे.