लाल ध्वजाच्या व्यासपीठावर दोन भगवे ध्वज एकत्र आलेयत असे राज ठाकरे म्हणाले. शेतकरी कामगार पक्षाचा 78 वा वर्धापन दिन पनवेल मध्ये साजरा झाला, त्यावेळी ते बोलत होते. खांदा कॉलनी येथील गुरुद्वाराशेजारील पोलीस मैदानावर शेकापचा मेळावा पार पडला. या सोहळ्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांच्यासह विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी काही महत्वाचे मुद्दे मांडताना राज ठाकरे म्हणाले, “आज रायगडचा मुद्दा तुम्ही सर्वांनी समजून घ्यायला हवा. महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री राज्यात लहान मुलांना हिंदी कशी शिकवता येईल याचा विचार करत. पण महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांचा विचारच नाही. याचा भीषण स्वरुप म्हणजे रायगड जिल्हा आहे. रायगडच्या शेतकऱ्यांच्या जमिनी चालल्या आहेत. उद्योगधंदे येतायत. एका बाजुला शेतकरी बरबाद होतोय. दुसऱ्या बाजुला बाहेरुन उद्योगधंदे येतायत. रायगडमधील तरुण तरुणी येथे कामाला राहिले पाहिजेत,यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे,असे राज ठाकरे म्हणाले.
“देशाचा गृहमंत्री ठणकावून सांगतो मी हिंदी नव्हे गुजराती भाषिक आहे. यांचं काय राजकारण चाललंय ते समजून घ्यायला हवं”, असेही राज ठाकरे म्हणाले.