ओमान किनाऱ्याजवळ फ्रॅक्चर आणि रक्तस्त्राव झालेल्या एका पाकिस्तानी क्रू मेंबरला भारतीय नौदलाने वैद्यकीय मदत केली. हा सदस्य ओमान किनाऱ्यापासून सुमारे जवळपास साडेसहाशे किलोमीटर पूर्वेकडे असलेल्या मासेमारी जहाजावर होता.
स्टेल्थ फ्रिगेट असलेल्या आयएनएस त्रिकंदला शुक्रवारी, ४ एप्रिल रोजी इराणी जहाज अल ओमेदीचा एक कॉल आला. यानुसार इंजिनवर काम करताना क्रू मेंबरच्या बोटांना गंभीर दुखापत झाल्याचं कळलं
वैद्यकीय मदतीसाठी आयएनएस त्रिकंदने जलद गतीने आपला मार्ग बदलला. जखमी झालेल्या क्रू मेंबरची ओळख पटली असून तो पाकिस्तानी (बलूच) नागरिक आहे आणि त्याला खूप फ्रॅक्चर आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती, यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता.
आयएनएस त्रिकंदमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांचे एक वैद्यकीय पथक होते. यामध्ये मरीन कमांडो (MARCOS) आणि जहाजाच्या बोर्डिंग टीमचाही समावेश होता. क्रू मेंबरला भूल देण्यात आली आणि टीमने जखमी बोटांवर लहान शस्त्रक्रिया केली. ही शस्त्रक्रिया तीन तासांहून अधिक काळ चालली आणि रक्तस्त्राव नियंत्रणात आणण्यात आला. या प्रक्रियेमुळे गँगरीनमुळे जखमी बोटांना होणारे कायमचे नुकसान टाळता आले.