भारत पाकिस्तान तणावादरम्यान एक धक्कादायक घटना समोर येत आहे. नागपुरातील महिलाही पाकिस्तानात गेल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. ही ४३ वर्षीय महिला काश्मीरमधून बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. मुलाला इथेच सोडून ही महिला पाकमध्ये पळाल्याची शक्यता असून पाक धर्मगुरुच्या ऑनलाईन ओळखीतून महिलेने LOC पार केले असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
नागपूरच्या सुनीता जामगडे या महिलेच्या अचानक बेपत्ता होण्याच्या घटनेमुळे सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे. कारगिलच्या सीमेवरील शेवटच्या ‘हुंदरमान’ गावातून तिने नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात प्रवेश केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सुनीता जामगडे ही नागपूरमधील संत कबीर नगर भागात राहणारी महिला असून, ती पूर्वी एका खासगी रुग्णालयात नर्स म्हणून काम करत होती.
ती १४ मे रोजी आपल्या १२ वर्षीय मुलासह काश्मीरच्या दिशेने निघाली होती. मुलाला थोड्याच वेळात परत येते असे सांगून सोडून दिले आणि त्यानंतर तिचा काहीही थांगपत्ता लागलेला नाही. स्थानिक नागरिकांनी हा मुलगा एकटाच फिरताना पाहून त्याला तातडीने लडाख पोलिसांच्या हवाली केले. सुनिता ही काही काळापासून पाकिस्तानमधील एका धर्मगुरूच्या संपर्कात होती. त्याच्यासोबतच्या ऑनलाइन संभाषणांमुळे ती मानसिकदृष्ट्या प्रभावित झाली होती, असा संशय आहे. मात्र महिला मानसिक रुग्ण असल्याचा दावा तिच्या आईने केला आहे.