आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा येथून इस्रोने आज सकाळी ५.५९ वाजता सतीश धवन अंतरिक्ष केंद्रातील पहिल्या लाँच पॅडमधून पीएसएलव्ही-सी61 (PSLV-C61) रॉकेट लाँच केले होते. मात्र काही तांत्रिक कारणामुळं इस्रोचे हे मिशन फेल झाले आहे. PSLV रॉकेट तिसरा टप्प्यापर्यंत पोहचू शकला नाही. याची माहिती इस्रोचे प्रमुख व्ही नारायणन यांनी दिली आहे.
इस्रो प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार, सॅटेलाइट लाँच केल्यानंतर पहिला आणि दुसरा टप्पा यशस्वीपणे पार करण्यात आला. मात्र तिसरा टप्पा पार करण्याआधीच काही तांत्रिक बाबींचा अडथळा आल्याने मिशन पूर्ण होऊ शकले नाही. ‘तिसऱ्या टप्प्याचे संचालन सुरू असतानाच आम्हाला तांत्रिक अडचण आढळली. त्यामुळं मिशन तिथेच थांबवण्यात आले. आता आम्ही या डेटाचे विश्लेषण करू त्यानंतर पुन्हा एकदा मिशन यशस्वीरित्या पूर्ण करू’, असं त्यांनी म्हटलं आहे.