औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे आहे. ही कबर नष्ट करण्यात यावी, अशी मागणी केल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर होत आहे. मागच्या आठवड्यात हिंदुत्ववादी संघटनांनी कबर उखडून टाकण्याचा इशाराही दिला आहे. मात्र राज्य सरकारने मोठा फौजफाटा कबरीच्या ठिकाणी तैनात करून प्रतिबंधक कारवाई केली. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका मांडली. दुर्दैवाने सरकारला या कबरीचे संरक्षण करावे लागत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने भिवंडीत पहिल्या शिव मंदिराचे लोकार्पण सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या सोहळ्यात बोलत असताना फडणवीस यांनी औरंगजेबाच्या कबरीबाबत भाष्य केले. यावेळी ते म्हणाले, या देशात महिमामंडन होईल, तर ते छत्रपती शिवरायांच्या मंदिराचे होईल, औरंगजेबाच्या कबरीचे होणार नाही. खरंतर औरंग्याची कबर आपल्या महाराष्ट्रात कशाला हवी? असा प्रश्न पडेल. पण आपल्याला कल्पना आहे. भारतीय पुरातत्व विभागाने या कबरीला ५० वर्षांपूर्वी संरक्षित स्थळ म्हणून घोषित केलेले आहे. म्हणून त्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारची आहे. ज्या औरंग्याने आमच्या हजारो लोकांना मारले, दुर्दैवाने त्याच्याच कबरीचे संरक्षण आम्हाला करावे लागत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, पण यानिमित्ताने एक वचन देतो. काहीही झाले तरी या महाराष्ट्रात औरंग्याच्या कबरीचे महिमामंडन होऊ देणार नाही. त्याचे उदात्तीकरण होऊ देणार नाही. जर उदात्तीकरण करण्याचा कुणी प्रयत्न करत असेल तर त्याचा प्रयत्न चिरडून टाकण्याचे काम आम्ही करू.