मागील आठवड्यापासून राज्याला उन्हाचा तडाखा बसत आहे. त्यातही विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद होत असून पाठोपाठ मराठवाड्यातदेखील तापमानाचा पारा वाढत आहे. लवकरच मे महिन्याची सुरूवात होणार आहे. मे महिन्यात पारा आणखी वाढणार आहे. त्यामुळं नागरिकांना उष्माघातापासून वाचण्यासाठी काय करावे आणि कोणती लक्षणे आहेत? याची माहिती जाणून घेऊयात. तसंच, उन्हाळे लागणे म्हणजे काय? हे देखील माहिती करुन घेऊया.
उन्हाचा तडाखा वाढल्याने उन्हाळी लागण्याचे प्रमाण वाढले आहे. उन्हाळी लागणे म्हणजे वारंवार लघवीला होणे त्याचबरोबर जळजळ होणे. मूत्रनलिकेत दाह व काहीवेळा रक्त जाणे, असा त्रास होतो. अशावेळी लघवी गढूळ होते किंवा रक्तामुळं लघवी लालसर तपकिरी असते. या लक्षणांकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा आरोग्याचे नुकसान होऊ शकते.
उन्हात उघड्या अंगाने बसणे, चप्पल न घालता उन्हात चालणे, कडक उन्हात रिकाम्या पोटी राहणे, कमी पाणी पिणे यामुळं उन्हाचा त्रास अधिक जाणवतो. तसंच, कूलर किंवा एसीमध्ये खूप वेळ बसल्यावर लगेच उन्हात बाहेर गेल्याने किंवा उन्हातून आल्यावर लगेच थंड पाणी पिल्याने उन्हाळी लागू शकते. रोगप्रतिकारकशक्ती कमी असणाऱ्यांना, लहान मुले किंवा वृद्ध व्यक्तींना उन्हाळी लागण्याचे प्रमाण जास्त असते. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. उन्हाळ्यात शरीरात उष्णता वाढल्याने लघवी करताना आग आणि जळजळ होण्याची शक्यता असते.
उन्हाच्या दिवसांत जास्त तिखट आणि तेलकट पदार्थ, मांसाहार तसेच उच्च साखरेचे पदार्थ आणि तळलेले पदार्थ टाळणे आवश्यक आहे. तसेच जास्त चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड पेये पिणे टाळावे. त्याऐवजी ताक, नारळ पाणी असे पदार्थ प्या. तसंच, फळांचे सेवन अधिक करा. पचायला जड आणि तेलकट पदार्थापासून दूर राहावे. जवळ खडीसाखर, काळ्या मनुका, आवळा, बत्तासा ठेवावा व ते मधून मधून खावे. दुपारची झोप टाळावी. रात्री उशिरा हॉटेलमध्ये जेवणे टाळावे.