म्हाडा कोकण मंडळाची लॉटरी जाहीर झाली आहे. कोकण मंडळाच्या या पाच हजाराहून अधिक घरांच्या लॉटरीत विधानसभा विधान परिषद सदस्य तसेच माजी सदस्य यांच्यासाठी 98 घरे राखीव ठेवण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे राज्यातील आमदार, खासदारांसाठी राखीव असलेल्या या घरांपैकी एका घराची किंमत अवघी साडेनऊ लाख रुपये आहे.
ही घरे अत्यल्प उत्पन्न गटात आहेत. मात्र, एका आमदाराचे सध्याचे वेतन हे महिन्याला एक लाखापेक्षा जास्त शिवाय महागाई भत्ता वेगळा दिला जातो. त्यामुळे अत्यल्प उत्पन्न गटात नेमके कोणते आमदार यासाठी अर्ज करणार हे पहावं लागेल. दरम्यान, याबाबत म्हाडाकडे विचारणा केली असता महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास अधिनियम 1976 नुसार उत्पन्न गटानुसार आमदार-खासदारांसाठी घरे राखीव ठेवावी लागतात. या घरांसाठी आमदार-खासदारांकडून अर्ज न आल्यास ती खुल्या वर्गातील अर्जदारांना उपलब्ध होतात, असे म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.