राष्ट्रीय जनता दल प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची प्रकृती खालावली आहे. रक्तातील साखर वाढल्यामुळे त्यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना पाटण्यातील राबडी निवासस्थानी डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लालूंवर अँजिओप्लास्टी झाली होती. डॉक्टरांनी लालू यादव यांच्यावर मुंबईत उपचार केले होते. कारागृहात शिक्षा भोगत असताना लालू यादव यांना हृदयविकाराचा त्रास असल्याचे निदान झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार सध्या त्यांच्यावर पाटण्यात डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार चालू आहेत. मात्र लवकरच त्यांना पुढील उपचारासाठी दिल्लीला हलवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
लालूप्रसाद यादव यांना मूत्रपिंडाशी संबंधित आजार असल्याचे 2022 मध्ये तपासणीत समोर आले होते. त्यांचे मूत्रपिंड फक्त 75 टक्के निकामी झाले होते. त्यानंतर त्यांना मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्याचा सल्ला देण्यात आला होता. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लालूप्रसाद यादव यांची मुलगी राहिनी आचार्य यांनीच त्यांचे मूत्रपिंड वडील लालूप्रसाद यादव यांना दान करण्याचा निर्णय घेतला होता. 5 डिसेंबर 2022 रोजी ही सर्व प्रक्रिया पार पडली होती. लालू यादव यांना २०२१ मध्ये हृदयविकार असल्याचे निदान झाले होते. रांचीच्या बिरसा मुंडा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असताना त्यांना हृदयविकाराचा त्रास झाला. त्यानंतर, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना विशेष उपचारांसाठी मुंबईतील रुग्णालयात नेण्यात आले. २०२३ मध्ये त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली.