सिक्किममध्ये रविवारी सायंकाळी लष्करी छावणीवर दरड कोसळून तिघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये जवानांचाही समावेश आहे. मृतांची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. या दुर्घटनेनंतर नऊ जवान बेपत्ता झाले आहेत. या जवानांचा शोध घेतला जात आहे.
उत्तर सिक्कीममध्ये ही दुर्घटना सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. डोंगर कड्याचा एक मोठा भाग तुटून लष्करी छावणीवर पडला. यामुळे छावणीबरोबरच आजूबाजूच्या घरांचंही नुकसान झालं आहे. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटना झालेल्या परिसरामधील अनेकजण बेपत्ता आहेत. मृतांची ओळख पटवण्यासाठी आणि दरडीखाली अडकलेल्यांचा शोध घेण्यासाठी बचाव मोहीम हाती घेण्यात आली आहे.
उत्तर सिक्कीममध्ये जोरदार पाऊस पडत असून अनेक ठिकाणी दरड कोसळली आहे. बरेच रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. येथील लोचन आणि लाचुंग परिसरामध्ये दीड हजार पर्यटक अडकून पडले आहेत. मंगन जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक सोनम देचू भूटिया यांनी लाचेनमध्ये ११५ आणि लाचुंगमध्ये १३५० पर्यटक अडकले असल्याची माहिती दिली. दोन्ही बाजूने रस्ते बंद असल्याने पर्यटक अडकून पडले आहेत.