प्रयागराज येथे पौष पौर्णिमेला सुरू झालेल्या महाकुंभाची महाशिवरात्रीच्या दिवशी अधिकृत सांगता झाली. एकूण 45 दिवस चालणाऱ्या या महाकुंभात 66 कोटीहून अधिक भाविकांनी स्नान केलं. महाकुंभ सुरू होण्यापूर्वी जवळपास 45 कोटी भाविक येतील असा अंदाज उत्तर प्रदेश सरकारने व्यक्त केला होता. मात्र आलेल्या भाविकांची रेकॉर्डब्रेक नोंद झाल्याचं दिसतय. पण, जवळपास महिनाभर चाललेल्या या महाकुंभ मेळ्यात भाविकांच्या संख्येची गणना कोणी आणि कशी केली गेली हा प्रश्न अनेकांच्या मनात डोकावत असेल.

अंदाजाने आकडे देऊन अतिशयोक्ती तर केलेली नाही ना? असा प्रश्न विचारला जात असतानाचं विरोधकांकडूनही काही प्रश्न उपस्थित केले जात होते. पण योगी सरकारने लोकांची गणना करण्यासाठी प्रथमच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरली आहे. सध्या जगभरातील गर्दी मोजण्यासाठी एआय प्रणालीचीचं मदत घेतली जाते. यातून केलेल्या मोजणीच्या यशाचा दर हा जगात सर्वाधिक असून तो ९० टक्के ते ९९ टक्के आहे. यशाची ही आकडेवारी फार मोठी आहे.
भाविकांची गणना करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने एक विशेष टीम तयार केली. या टीमचे नाव होतं क्राउड असेसमेंट टीम. ही टीम महाकुंभला येणाऱ्या लोकांची रिअल टाईमवर मोजणी करत होती. त्यासाठी खास कॅमेऱ्यांची मदत घेतली जात होती, जे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने लोकांची मोजणी करत होते. महाकुंभात आलेल्या भाविकांचे चेहऱ्यांचे स्कॅनिंग हे कॅमेरे करायचे. त्यावरुन किती तासांत किती लाख लोक महाकुंभ मेळा परिसरात आले आहेत, याचा अंदाज बांधता येतो. शिवाय एका व्यक्तीला दोन वेळा मोजले जाऊ नये यासाठी खबरदारी घेतली जाते. यासाठी 1800 कॅमेरे लावण्यात आले होते. तसेच ही टीम लोकांची मोजणी करण्यासाठी ड्रोनची मदत घेत होती. जे एका विशिष्ट भागात गर्दीची घनता मोजते आणि एका दिवसात महाकुंभ कार्यक्रमात किती लोक उपस्थित आहेत हे शोधून काढते. तसेच इतर काही पद्धतींद्वारे गर्दीची मोजणी केली जात होती. एक म्हणजे पीपल फ्लो… एखाद्या विशिष्ट मार्गावरून किती लोक येत आहेत ते महाकुंभात प्रवेश केल्यावर मोजले जात होते.
अध्यात्माच्या या भव्य उत्सवात देश विदेशातून लाखो भाविकांनी उपस्थिती दर्शवली.. त्यापैकी काहींनी सनातन धर्म समजून घेऊन दीक्षा घेतली. काही घटनांनी महाकुंभ मेळ्याला गालबोट लागले हे खरं पण एवढ्या भव्य सोहळ्याचे आयोजन करणे, हे काही सोपे काम नव्हते. पण योगी सरकारने ते शिवधनुष्य पेललं.
आता 2027 मध्ये नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे.. त्याची तयारी आतापासून सुरू झालीय.. हा कुंभमेळा डिजिटल टेक्नॉलॉजी कुंभ’ म्हणून ओळखला जावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.