आज अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर जोरदार टीका केली आहे. अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुतीचा जाहीरानामा दाखवत जनतेला दिलेल्या आश्वसनांची आठवण करुन दिली.
लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवण्यासह इतर अनेक मुंद्द्याबात त्यांनी सवाल केले. यावेळी ते म्हणाले की, “आज आचार्य अत्रे असते तर म्हणाले असते, गेल्या १० हजार वर्षात इतका बोगस अर्थसंकल्प झाला नसेल. निवडणूक काळात वारेमाप जाहीराती केल्या होत्या. थापा मारायचे थांबणार नाही असे घोषवाक्य हवे. मारल्या होत्या थापा भारी, महाराष्ट्र केला कर्जबाजारी”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
“निवडणुकीच्या काळात महायुतीकडून वारेमाप जाहिराती करण्यात आल्या. जाहिरातीत अनेक गोष्टी सांगितल्या आणि सरकार निवडून आणले, मते मिळवली. त्यातील ईव्हीएम घोटाळा हा भाग वेगळा आहे. पण प्रचंड बहुमताच्या या सरकारने थापांमधून एकतरी आश्वासन पूर्ण केले का? लाडक्या बहिणींना २१०० रुपये दिले का?”, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.