मुंबई लोकलमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका व्हिडीओमध्ये जनरल डब्यामध्ये पुरुषाने महिलेला मारहाण केल्याचा घटनाक्रम कॅमेरात कैद झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल झालेला व्हिडिओ हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजेच सीएसएमटीवरुन सुटणाऱ्या अंबरनाथ लोकल ट्रेनमध्ये घडला आहे. या ट्रेनमधील जनरल डब्यात जागेच्या वादातून एका पुरुषाने चक्क महिला प्रवाशाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना नेमकी ट्रेन कुठे असताना घडली आणि किती वाजता घडली याची माहिती समोर आलेली नाही. मारहाण करणारी आणि ज्या महिलेला मारहाण केली जात आहे ती महिला कोण आहे यासंदर्भातील तपशीलही समोर आलेला नाही.
विंडो सीटला बसलेल्या एका कुटुंबातील सदस्याला महिलेने शिवी दिली असा आरोप करत कुटुंबातील एक व्यक्ती तिला हातातील हॅण्ड बॅगने हाणामारी करण्यास सुरुवात करतो. नंतर ही व्यक्ती या महिलेवर धावून जाते. “तू आईवरुन शिवी कशी दिली?” असा जाब ही व्यक्ती महिलेला विचारताना दिसत आहे. दुसरीकडे अनेक प्रवासी या व्यक्तीला महिलेवर हात उचलू नको असं सांगत मारहाण करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करताना दिसतात. दरम्यान अजून कोणत्याही रेल्वे स्थानकावर याबाबत तक्रार दाखल झाली नाही.