मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात सर्वांनाच वेध लागले आहेत ते म्हणजे मान्सूनचे. मोसमी पावसाच्या निर्मिती प्रक्रियेला काही दिवसांपूर्वीच अंदमान आणि निकोबार बेट समुहांवर सुरुवात झाली आणि पाहता पाहता या वाऱ्यांनी अतिशय सकारात्मक वेग धारण करत पुढील टप्प्याच्या रोखानं प्रवास सुरू केला आहे. ज्यामुळं यंदाच्या वर्षी केरळात आणि पर्यायी महाराष्ट्रातही मान्सून तुलनेनं निर्धारित वेळेआधीच पोहोचण्यासाठीची पूरक वातावरणनिर्मिती होताना दिसत आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये मान्सून मालदीवला पूर्णपणे व्यापत दक्षिण अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात पुढील प्रवास सुरू करेल. सध्या कर्नाटकच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचं क्षेत्र तयार होऊन त्याची तीव्रता वाढण्याचे संकेत असल्यानं पुढील काही दिवसांत देशाच्या पश्चिम किनारपट्टी क्षेत्रात अर्थात कर्नाटक, गोवा आणि कोकण किनारपट्टी भागांमध्ये जोरदार ते मध्यम स्वरुपातील पावसाची शक्यता आहे. ज्यामुळं आता केरळात मान्सून २७ मे आणि त्यानंतर १ ते ५ जून दरम्यान तो महाराष्ट्रात धडकण्याची शक्यता आहे.