लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
राज्यभरात दरवर्षी आजचा दिवस म्हणजे 27 फेब्रुवारी मोठ्या उत्साहात मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. आता तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. मराठी कवी, नाटककार विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो.. कुसुमाग्रजांनी मराठी कविता उंच पातळीवर नेऊन ठेवली. शिरवाडकरांची लेखणी कवितेप्रमाणे नाट्यलेखनातही मनापासून रमली. त्यांनी आपल्या नाटकांतून मानवी मनाच्या अथांगतेचे दर्शन घडवले.
कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याच्या निमित्ताने 27 फेब्रुवारी हा दिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय 21 जानेवारी 2013 रोजी महाराष्ट्र सरकारने घेतला.

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण 2010 मध्ये कवी कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून नमूद करण्यात आला आहे. मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. शिवाय महाराष्ट्राच्या बोलीला साहित्यात विशेष असे स्थान निर्माण करून देण्यात कुसुमाग्रजांचं मोलाचं योगदान आहे. मराठी भाषेचं, साहित्याचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि त्याचा सन्मान करण्यासाठी या दिवशी सरकारी पातळीवर अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. मराठी साहित्याच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव म्हणून सरकारकडून दोन विशेष पुरस्कारही दिले जातात. शाळा महाविद्यालयात या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.
मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी राजभाषा दिन यातील फरक
आजच्या दिवसाला अनेक जण मराठी राजभाषा दिन म्हणतात. अर्थात या दोन्ही दिवसांमध्ये फरक आहे, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. 1 मे हा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद ३४७ नुसार मोठ्या प्रमाणात बोलल्या जाणाऱ्या कोणत्याही भाषेला राजभाषा म्हणून मान्यता देण्याची तरतूद व अधिकार राष्ट्रपतींना आहेत. १ मे १९६० ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. राज्य कारभाराची अधिकृत भाषा म्हणून मराठी भाषेला मान्यता देण्यात आली. तेव्हापासून हा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करतात.. महाराष्ट्र सरकारच्या सामान्य प्रशासन विभागानं १० एप्रिल १९९७ रोजी काढलेल्या परिपत्रकात १ मे हा ‘मराठी राजभाषा दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसा तो महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून १ मे रोजी साजरा करण्यात येत होता. परंतु, कालांतरानं तो विस्मृतीत गेला. कारण या दिवशी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन सुद्धा साजरा करतात.. त्यामुळं १९९७ ला शासनाला पुन्हा परिपत्रक काढावं लागलं.

पण या एक दिवसापूरत मराठी भाषेचं महत्त्व, गोडवा सांगण्याऐवजी वर्षभर तिचा सन्मान आपण केला पाहिजे. आता सरकारी कार्यालयात मराठी बोलण्याची सक्ती करण्यात आली आहे. पण अशी सक्ती करण्याची गरजच पडायला नको.. मराठी भाषा आपला अभिमान आहे. तिची जपणूक करणं, तिला वाढवणं, रुजवण ही आपली जबाबदारी आहे.
आजच्या या भागाची कुसुमाग्रजांच्या शब्दात सांगता करते..
माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा
तिच्या संगाने जागल्या दऱ्याखोऱ्यातील शिळा