महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामुळे नम्रता संभेराव हे नाव घराघरात पोहोचलं. आपल्या विनोदाच्या अचूक टायमिंगने आणि विविधांगी भूमिकांनी तिने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. या कार्यक्रमाबरोबरच नम्रता नाटक, चित्रपटातही आपल्याला दिसते. सध्या ती ‘थेट तुमच्या घरातून’ या नाटकात काम करत आहे. ती सोशल मीडियावर सुध्दा सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसोबत नम्रताने एक आनंदाची बातमी शेअर केली आहे.
‘नाच ग घुमा’ या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट लक्षवेधी अभिनेत्री हा पुरस्कार मिळाला आहे. त्याविषयी तिने खास पोस्ट शेअर केली आहे.
आर्यन्स सन्मान पुरस्कार सोहळ्यात या पुरस्काराने तिला गौरविण्यात आलं. 2024 मध्ये आलेल्या परेश मोकाशी दिग्दर्शित नाच गं घुमा या चित्रपटात नम्रताने आशा या घरकाम करणाऱ्या बाईची भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेचं खूप कौतुकही झालं. याच भूमिकेसाठी नम्रताला सर्वोत्कृष्ट लक्षवेधी अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.
नम्रता संभेरावची पोस्ट
नम्रताने तिचा आनंद पोस्ट करत व्यक्त केलाय. ‘2025 मधील माझं पहिलं पारितोषिक. नाच गं घुमा ह्या सिनेमावर आणि माझ्या पात्रावर आशा ताई वर सगळ्यांनी भरभरून प्रेम केलं ही त्या कामाची पावती. आर्यन्स सन्मान पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट लक्षवेधी अभिनेत्री म्हणून चित्रपटासाठी मिळालेला माझा पहिला award’
मुक्ता ताई…दिग्दर्शक परेश मोकाशी सर , लेखिका मधुगंधा कुलकर्णी आणि माझे निर्माते स्वप्निल जोशी तेजस शर्मिष्ठा तृप्ती मधुगंधा ताई परेश सर आणि माझी संपूर्ण टीम thanks to all of you’ असं म्हणत नम्रताने सर्वांचे आभार मानले आहेत.
तिच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. चाहत्यांनी सुध्दा अभिनंदन करत कौतुक केलं आहे.