भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी लंडन येथे काश्मीर प्रश्नावर मोठं विधान केलं. ते म्हणाले, “पाकव्याप्त काश्मीर परत भारताला मिळण्याची आम्ही वाट पाहतोय. तो हिस्सा भारताकडे परत आल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये शांतता निर्माण होईल.” त्यांच्या या वक्तव्यावर भारत व पाकिस्तानमधून प्रतिक्रिया येत आहेत. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी देखील यावर त्यांच मत व्यक्त केलं आहे. अब्दुल्ला म्हणाले, “आपले परराष्ट्रमंत्री म्हणत आहेत की आम्ही पाकव्याप्त काश्मीर भारतात आणणार आहोत. अहो, पण तुम्हाला अडवलंय कोणी? तुम्ही जम्मू-काश्मीरचा नकाशा पाहिलात तर त्यात आपला एक मोठा भूभाग पाकिस्तानात असल्याचं दिसतं. मात्र, काश्मीरचा आणखी एक मोठा भाग चीनच्या ताब्यात आहे. त्यावर कोणीच काही बोलत नाही.”
मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले, “तुम्ही पीओके भारतात आणणार आहात तर कृपा करा आणि चीनच्या ताब्यात आपला भूभाग आहे तो देखील भारतात परत आणा.” भाजपावर निशाणा साधत अब्दुल्ला म्हणाले, “तुम्ही लोकांनी जम्मू काश्मीरच्या नकाशाचे दोन तुकडे केले आहेत. आता म्हणतायत की लडाखच्या लोकांना हेच हवं होतं. परंतु, तुम्ही खरंच कधी लडाखच्या लोकांना विचारलंय का त्यांना नेमकं काय हवं होतं? काय हवं आहे?”