ज्योती मल्होत्राप्रमाणेच आणखी एक भारतीय युट्यूबरही पाकिस्तासाठी हेरगिरी करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ज्योतीपासून सुरू झालेला हा तपास सध्या ओडिशापर्यंत पोहोचला असून, यामध्ये पुरी येथील युट्यूबर प्रियंका सेनापती तपास यंत्रणांच्या रडारवर आली आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये ज्योतीनं ओडिशातील पुरी शहराला भेट दिली होती. याचवेळी तिनं या भागातील काही फोटो आणि व्हिडीओ काढले. तिनं हे फोटो पाकिस्तानला दिलेल्या माहितीशी जोडले गेलेले नाहीत ना, याच धर्तीवर सध्या तपास यंत्रणा विविध बारकावे तपासत कारवाई करत आहेत.
यंत्रणांच्या संशयानुसार प्रियंका सेनापती ज्योतीच्या पुरी दौऱ्यादरम्यान तिच्या संपर्कात आली असून, त्याच कारणामुळं प्रियंकाचीसुद्धा चौकशी करण्यात आली आहे. दरम्यान या कारवाईतच प्रियंकाच्या एका लाईव्ह पोस्टनं नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं. ‘ज्योती फक्त माझी युट्यूबवरील मैत्रीण होती. तिच्या कामाशी माझा काही संबंध नसून, मला कधी त्यावर संशयही वाटला नाही. ती पाकिस्तानची हेर आहे हे मला ठाऊक असतं तर मी कधीच तिला भेटलेही नसते. मी तपासात पूर्ण सहकार्य करण्यासाठी तयार आहे’, असं तिनं सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्ट केलं.