भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं तेव्हा पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करत होते. स्वत: त्यांनीच हा दावा केला आहे. इतकंच नाही तर आपल्या लष्कराने दिलेलं प्रत्युत्तर पाहून भारताने शस्त्रसंधीसाठी विनंती केल्याचा हास्यास्पद दावाही त्यांनी केला आहे. त्यांच्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, पाकिस्तानातील काही पत्रकारही त्यांची खिल्ली उडवत तथ्य वेगळं असल्याचं सांगत आहेत. इस्लामाबादमधील पाकिस्तान स्मारकात आयोजित एका विशेष कार्यक्रमाला ते संबोधित करत होते.
“सकाळची वेळ होती. मला सवय असल्याने, फजरनंतर मी स्विमिंग करतो. मी माझा सेक्यूअर फोन सोबत नेला होता. मी स्टाफला जर घंटी वाजली तर लगेच सांगा असं सांगितलं होतं. घंटी वाजल्यानंतर जनरल मुनीर लाईनवर होते. आम्ही भारताला जोरदार प्रत्युत्तर दिलं असून, आता शस्त्रसंधीसाठी विनंती केली जात आहे, तुमचा काय विचार आहे? अशी विचारणा त्यांनी केली. मी म्हटलं यापेक्षा मोठी काय गोष्ट असू शकते. तुम्ही शत्रूला कानाखाली मारली असून, त्याचं डोकं गरगरलं आहे, त्यामुळे आता ते शस्त्रंसधघीसाठी मजबूर आहेत. तुम्ही शस्त्रसंधीची विनंती स्विकारा,” असं शहबाज शरीफ म्हणाले.