बिहारमध्ये रुग्णालयात घुसून पाच जणांनी एका रुग्णाची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना घडली आहे. पाच हल्लेखोर रुग्णालयात शिरले, नंतर सहजपणे रुग्णाच्या रुममध्ये गेले आणि गोळ्या घालून पळ काढला. या घटनेनंतर बिहारमधील कायदा सुव्यस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. हा संपूर्ण घटनाक्रम रुग्णालयातील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सीसीटीव्हीत पाचही आरोपी गोळ्या घातल्यानंतर पळून जाताना दिसत आहेत. पीडित चंद्रन मिश्राचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
मिश्रा हा एक कट्टर गुन्हेगार असून त्याच्यावर डझनभर खूनाचे गुन्हे दाखल आहेत. वैद्यकीय कारणास्तव त्याला पॅरोल मिळाला होता. त्याला पाटण्याच्या पारस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, जिथे आज सकाळी गोळीबार झाला. या भयानक हल्ल्यामागे प्रतिस्पर्धी टोळीचा हात असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.