देशातील प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर! ठाकरे बंधू गायब एकनाथ शिंदे, अजित पवारांचाही समावेश

विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या तसेच आपल्या कामाने छाप पाडणाऱ्या मोजक्या 100 महान व्यक्तींची यादी शुक्रवारी प्रकाशित झाली असून, त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्या, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दुसऱ्या स्थानावर कायम आहेत. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 6 व्या क्रमांकावर स्थिर आहेत.

गेल्यावर्षीच्या यादीतही तिघे याच स्थानी होते. तथापि, यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्यावर्षीच्या 50 व्या स्थानावरून थेट 13 व्या स्थानी झेप घेतली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे व मनसेप्रमुख राज ठाकरे या बंधूंचा मात्र या महत्वाच्या शंभर नेत्यांच्या यादीत समावेश झालेला नाही. लोकसभेतील विरोधी पक्षनेते या नात्याने राहुल गांधी यादीत नवव्या स्थानी दिसत आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवारांना पुष्कळ मागे म्हणजे 77 व्या स्थानी टाकून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे 57 व्या स्थानी आले आहेत. ‘मातोश्री’च्या ठाकरेंना मागे सोडून स्वतःचा राजकीय मार्ग प्रशस्त करणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या यादीत 51 व्या स्थानी दिसत आहेत.
गेल्या वर्षी देशातील 18 वे महत्वाचे नेते म्हणून अरविंद केजरीवाल यांची नोंद झाली होती. त्यावेळी त्यांचा आम आदमी पार्टी हा पक्ष मोदींना आव्हान देऊ शकेल असेही मानले जात होते, पण दिल्लीतील पराभवानंतर तसेच भ्रष्टाचाराच्या आरोपांत तुरुंगवारी घडल्यानंतर केजरीवाल यांची यादीतील घसरण थेट ५२ व्या स्थानावर झाली आहे. फडणवीसांपाठोपाठ चंद्रबाबू नायडू यांचा १४ वा क्रमांक आहे. त्यांचे नाव अशा महत्वपूर्ण नेत्यांच्या यादीत प्रथमच घेतले गेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here