महाकुंभमेळ्यात मौनी अमावस्येला चेंगराचेंगरीत 30 जणांचा मृत्यू झाल्यानंतर आज (दि.30) पुन्हा भीषण आगीची घटना घडली. प्रयागराज येथील सेक्टर 22 मध्ये ही आग लागली असून या आगीत 15 टेन्ट जळून खाक झाले आहेत.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. या आगीत अनेक तंबू जळून खाक झाले आहेत. तसेच लाखो रुपयांचं मोठं नुकसान देखील झालं आहे.
या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते. मात्र आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
महाकुंभ परिसरातील नागेश्वर पंडालला ही आग लागली. दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास ही आग लागली आहे. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून अनेक तंबू जळून खाक झाले आहेत. पंडालमध्ये उपस्थित सर्व लोक सुरक्षित आहेत. अग्निशमन दलाने अथक परिश्रमानंतर काही मिनिटांत आग आटोक्यात आणली.

दरम्यान याआधीही 20 जानेवारीला महाकुंभात भीषण आग लागली होती. यामध्ये सुमारे 40 गवताच्या झोपड्या आणि सहा तंबू जळून खाक झाले होते. पण सुदैवाने यावेळीही जीवितहानी टळली होती. सेक्टर 19 मधील करपात्रीजींच्या छावणीजवळील गीता प्रेस कॅम्पच्या स्वयंपाकघरात ही आग लागली होती. नंतर ती फोफावली आणि अनेक तंबूंना कचाट्यात घेतले. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले होते.