लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक, 2025 हे सादर करण्यात आले होते. या विधेयकाला मंजूरी देण्यात आली. त्यानंतर गुरुवारी राज्यसभेतही हे वक्फ विधेयक मंजूर झाले. या विधेयकाच्या बाजूने 128 मते पडली, तर विरोधात 95 मते पडली होती. दोन्ही सभागृहातील मंजुरीनंतर वफ्क सुधारणा विधेयक राष्ट्रपतींकडे अंतिम मंजुरीसाठी गेले होते. त्यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या विधेयकाला मान्यता दिली आहे. त्यामुळे आता हा नवा कायदा देशात लवकरच लागू होणार आहे.
सरकारने एका अधिसूचनेत म्हटले आहे की, ‘संसदेने पारित केलेल्या वक्फ दुरुस्ती कायदा, 2025 ला राष्ट्रपतींची संमती मिळाली आहे. यापूर्वी वक्फ (दुरुस्ती) विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत जोरदार चर्चेनंतर मंजूर करण्यात आले होते. त्याचवेळी, नवीन कायद्याला काँग्रेस, एआयएमआयएम आणि आम आदमी पार्टी (आप) यांनी स्वतंत्र याचिकांसह सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. देशात अनेक ठिकाणी या विधेयकाच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली.
वफ्क विधेयकावर लोकसभेत सुमारे 12 तास मॅरेथॉन चर्चा झाली. तर राज्यसभेत सुमारे 13 तास चर्चा झाली. या दीर्घ चर्चेनंतर हे विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आले. यानंतर हे विधेयक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे कायदा होण्यासाठी त्यांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आले, ज्यावर त्यांनी स्वाक्षरी करून कायदा करण्यास मान्यता दिली.