विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आई ज्योती कदम यांच्या नावे कांदिवलीतील सावली डान्सबार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि आमदार रामदास कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले अनिल परब हे अर्धवट वकील आहेत. अर्धवट वकिलांचा सल्ला घेऊन नेहमी उद्धव ठाकरे चालतात म्हणूनच उद्धव ठाकरेंची ही परिस्थिती झाली आहे. आम्ही अनिल परब याच्यांवर अब्रूनुकसानीचा दावा करता येतो का हे पाहत आहोत, असंही पुढे रामदास कदम यांनी म्हटलं आहे.
सावली बारचा विषय आहे तो गेल्या 30 वर्षांपासून शेट्टी नावाचा एक इसम आहे, तो आमचा सावली बार चालवतो. हे वास्तव आहे. माझ्या पत्नीच्या नावाचा लायसन्स आहे. पण त्याचं ऑर्केस्ट्राचं लायसन्स आहे. मुलींचं, वेटरचं लायसन्स आहे, ते अनधिकृत नाही. तिथे डान्स चालत नाही. मात्र, मला एक गोष्ट कळली ती अशी आहे की, एका कस्टमरने एका मुलीवरती पैसे उधळले होते, ती गोष्ट जेव्हा मला कळली तेव्हा मी पोलिसांना तत्काळ ऑर्केस्ट्राचं लायसन्स, त्या मुलींचे लायसन्स पोलिसांना पुन्हा सबमिट करून टाकले. ते हॉटेल बंद करून टाकलं अशा घाणेरड्या पैशांची आम्हाला आवश्यकता नाही. आम्ही सक्षम आहोत, देवाने आम्हाला सगळं दिलं आहे. पण आमच्यावरती जे आरोप केले गेले, ते बेछुट आहेत, मला वाटतं, तुमचे अर्धवट वकील आहेत, त्यांना अद्याप अॅक्ट माहिती नाहीत, कायदा माहिती नाही. कायद्यामध्ये दिले आहे, जर एखाद्या इसमाला ते चालवण्यासाठी दिले असेल तर तो चालक जबाबदार असतो, मालक जबाबदार नसतो, असंही पुढे रामदास कदम म्हणालेत.