कर्नाटक सरकारच्या सरकारी कंत्राटी नोकऱ्यांमध्ये मुस्लिमांना चार टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस दत्तात्रय होसबळे यांनी विरोध केला आहे. आपलं संविधान धर्मआधारित आरक्षणाला परवानगी देत नाही, असं ते म्हणाले. तसंच, संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेच्या हे विरुद्ध आहे, असंही ते म्हणाले. अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्य समारोपावेळी ते बोलत होते.
दत्तात्रय होसबळे म्हणाले, “बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानात धर्मावर आधारित आरक्षण स्वीकारले जात नाही. असे करणारे कोणीही आपल्या संविधानाच्या शिल्पकाराच्या इच्छेविरुद्ध जात आहे.” त्यांनी असेही निदर्शनास आणून दिले की मुस्लिमांसाठी धर्मावर आधारित आरक्षण लागू करण्याचे पूर्वीचे अविभाजित आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्राने केलेले प्रयत्न उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले होते. तसंच, न्यायालयांनी अशा आरक्षणासाठी तरतुदी नाकारल्या असल्याचंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं.