राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्या मनसे या पक्षाची मान्यता रद्द करावी, अशी मागणी उत्तर भारतीय विकास सेना पक्षाचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर मनसेचे मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे म्हणाले, “आमचा पक्ष राहणार की नाही राहणार हे आता भय्ये ठरवणार असतील तर भय्ये मुंबईत राहणार की नाही, त्यांना इथे राहू द्यायचं की नाही हे आम्हाला ठरवावं लागेल.”
ते पुढे म्हणाले “त्या याचिकेमागील षडयंत्र तुम्ही लक्षात घ्या. हे सगळं प्रादेशिक पक्षांना संपवण्याचं षडयंत्र आहे. हे भाजपाचं षडयंत्र आहे. हे लोक (याचिकाकर्ते) भाजपाचेच पिट्टू आहेत. भाजपावाले या उभाविसेच्या माध्यमातून आमच्या पक्षाला नख लावण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आम्ही अशा गोष्टींना घाबरत नाही. आम्हाला कोणी संपवण्याचा प्रयत्न केला तर त्या लोकांना इथे ठेवायचं की नाही याचाही आम्हाला विचार करावा लागेल.