बीडच्या मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणी आता मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा सुद्धा घेण्यात आला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडिओ आता समोर आले आहेत. अतिशय क्रूरपणे त्यांची हत्या करण्यात आली. विकृत मानसिकतेचे हे मारेकरी त्यांना मारताना हसत असल्याचं दिसत आहे. आता या प्रकरणावर सामान्य नागरिकांपासून कलाकारांनी संताप व्यक्त केला आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रताप याने संतोष देशुमख हत्या प्रकरणावर पोस्ट शेअर केली आहे. इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत लिहिलं की, ‘मन सुन्न करणारे, मन हेलावून टाकणारे संतापजनक फोटो…संतोष देशमुख यांना न्याय मिळायलाच हवा’ असं म्हणत पृथ्वीकने संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी न्याय मागितला आहे.

त्याचबरोबर या कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनीदेखील पोस्ट शेअर केलीये. न्यूज चॅनल वरील संतोष देशमुखांवरील अत्याचाराचे फोटो पाहून अस्वस्थ व्हायला होतं. विकृतीची परिसीमा आहे ही…महाराष्ट्र असा नव्हता..दुःखद..’

त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. लेखिका मुग्धा गोडबोले यांनी कमेंट करत संताप व्यक्त केला आहे. मुग्धा गोडबोलेने कमेंट करत लिहिलं की, ‘हो फार भयानक आहे सगळं. निर्भया केस ची आठवण झाली मला. इतके तास एका माणसाचा इतका छळ करताना एकालाही वाटलं नसेल आपण किती भयानक काहीतरी करतो आहोत? कुठली शक्ती आहे ही?? काय संचारत असेल अंगात?? हसतात? फोटो काढतात? जनावरं चांगली यांच्यापेक्षा.’
दरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख हे भावूक झाले होते. त्यांनी हे फोटो डिलिट करावे असं सांगितलं होतं.