बीडमध्ये पितापुत्रांना अमानुषपणे मारहाण करणाऱ्या सतीश उर्फ खोक्या भोसलेला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. बीड पोलिस आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्त कारवाई करत प्रयागराज येथून त्याला ताब्यात घेतले. सतीश भोसले हा आमदार सुरेश धस यांचा निकटवर्ती मानला जातो. गेल्या काही दिवसांपासून तो फरार होता, मात्र पोलिसांनी सतत तपास करून त्याचा ठावठिकाणा शोधून काढला.
या प्रकरणात त्याच्यावर NDPS कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असून, वनविभागानेही त्याच्याविरोधात तक्रार नोंदवली होती. आता त्याला महाराष्ट्रात आणून पुढील कारवाई केली जाणार आहे. मागील १५-२० दिवसांत त्याच्यावर तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते, त्यामुळे तो अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करत होता. मात्र, पोलिसांनी त्याचा शोध घेत अखेर प्रयागराजमधून त्याला ताब्यात घेतले.
सतीश भोसलेची दहशत इतकी जास्त की, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यास गेलेल्या ढाकणे कुटुंबियांची साधी तक्रार देखील पोलिसांनी घेतली नाही. सोशल मीडियावर क्रूर मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला. गेल्या काही दिवसांपासून खोक्याच्या शोधात पोलिस होते आणि अखेर त्याला पकडण्यात यश आलं.