भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाने (आयआरसीटीसी) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ या एका विशेष रेल्वेची घोषणा केली होती. आता, उद्या म्हणजे ९ जूनपासून ही रेल्वे प्रवाशांच्या सेवेत सुरू होते आहे. ‘भारत गौरव टुरिस्ट ट्रेन’ अंतर्गत उद्यापासून ही यात्रा सुरू होत आहे. या रेल्वेचा एकूण ५ दिवसांचा महाराष्ट्रभर प्रवास असणार आहे. सकाळी साडे दहा वाजता ही रेल्वे सीएसएमटी मुंबई वरून माणगाव रेल्वे स्थानकात पोहचणार आहे. त्यानंतर, प्रवाशांना येथील रायगड किल्ल्यावर जाऊन किल्ले रायगड पाहता येईल.
यात्रेचा प्रवासमार्ग पुढीलप्रमाणे
मुंबई (सीएसएमटी)-रायगड-पुणे-शिवनेरी-भीमाशंकर-प्रतापगड-कोल्हापूर-पन्हाळा- मुंबई. म्हणजे, मुंबई, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या 4 जिल्ह्यातून ही ट्रेन ऐतिहासिक पर्यटन घडवणार आहे.
प्रमुख स्थळांना भेट, कुठे होणार पर्यटन
रायगड किल्ला – छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक येथे झाला व ही राजधानी होती.
लाल महाल, पुणे – छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपण येथे गेले.
कसबा गणपती व शिवसृष्टी,पुणे –पुण्याचे ग्रामदैवत व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील संग्रहालय.
शिवनेरी किल्ला – छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ.
भीमाशंकर ज्योतिर्लिंग – १२ ज्योतिर्लिंग पैकी एक प्रमुख धार्मिक स्थळ.
प्रतापगड किल्ला – अफझल खानावरील ऐतिहासिक विजयाचे ठिकाण.
कोल्हापूर – महालक्ष्मी मंदिर
पन्हाळा किल्ला – बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्याचे प्रतीक.