मध्यप्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री विजय शाह यांच्याविरोधात महू तहसील येथील मानपुर ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कर्नल सोफिया कुरैशी यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर ही कारवाई करण्यात आली. मध्यप्रदेश हायकोर्टाच्या आदेशानंतर ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र, हायकोर्टाच्या या आदेशाविरोधात मंत्री विजय शाह सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे.
मंत्री विजय शाह यांनी लष्करातील वरिष्ठ अधिकारी कर्नल सोफिया कुरैशी यांच्याबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. शाह यांनी एका सभेत कर्नल सोफिया कुरैशी याचे नाव न घेता पाकिस्तानी दहशतवाद्यांना इशारा दिला होता. ते म्हणाले होते की, ‘आम्ही त्यांची बहिण पाठवून दहशतवाद्यांची ऐशी की तैशी कारवाई केली’. त्यांच्या या वक्तव्यानंतर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या वादग्रस्त वक्तव्यानंतर मध्यप्रदेश हायकोर्टानेही कठोर पाऊल उचलली आहेत. कोर्टाने कर्नल सोफिया कुरैशी यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर स्वतः पावलं उचलून 4 तासांच्या आत विजय शाह यांच्याविरोधात FIR दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.