द इंडियाज गॉट लेटेंटे या शोच्या वादानंतर रणवीर अलाहाबादियाविरोधात मुंबई आणि आसाम राज्यात गुन्हा दाखल झाला होता. तसेच पुढील आदेश येईपर्यंत त्याच्या सर्व शोचे प्रदर्शन रोखण्यात आले होते. आज सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत रणवीर अलाहाबादियाच्या वतीने त्याचा पॉडकास्ट कार्यक्रम पुन्हा सुरू करू द्यावा, अशी मागणी केली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने रणवीरला त्याचा पॉडकास्ट शो पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. तसेच पुढील आदेश येईपर्यंत त्याच्या अटकेलाही स्थगिती मिळाली आहे.
रणवीर अलाहाबादियाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत त्याच्या ‘शो’च्या प्रदर्शनावर घातलेली बंदी मागे घेण्याची मागणी केली होती. अलाहाबादियाने याचिकेत म्हटले होते की, त्याच्या ‘शो’साठी २८० कर्मचारी काम करतात. शो बंद झाल्यास त्यांच्या अर्थाजनाचा प्रश्न निर्माण होईल. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, मूलभूत अधिकार हे अनिर्बंध नाहीत, त्यावर काही मर्यादा आहेत. सध्या याचिकाकर्त्याच्या ‘शो’वर बंदी घातलेली आहे. पॉडकास्ट सादर करताना नैतिकता, सभ्यता आणि शालीनतेचे पालन केले, जेणेकरून कोणत्याही वयोगटातील प्रेक्षक हा ‘शो’ पाहू शकतील, असे हमीपत्र याचिकाकर्ता देत असेल तर त्यांना शो पुन्हा सुरू करण्यासाठी परवानगी देता येईल.