गेल्या काही दिवसांपासून रणवीर अलाहाबादिया प्रकरणाची जोरदार चर्चा आहे. रणवीर अलाहाबादियानं त्याच्या ‘इंडियाज गॉट लेटंट’ शोमध्ये केलेल्या अश्लील टिप्पणीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या विधानाबाबत रणवीरविरोधात गुन्हे दाखल झाले असून अटकेपासून संरक्षण मिळावं, यासाठी रणवीर अलाहाबादियानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने अलाहाबादियाला खडे बोल सुनावले आहेत.
दरम्यान, आज झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने रणवीर अलाहाबादियाला सुनावताना म्हटलं, “अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली, समाजाच्या नियमांविरोधात बोलण्याचा कोणालाही परवाना मिळालेला नाही. ही अश्लीलता नाही तर काय आहे? आई-वडिलांना, बहिणींना लाज वाटेल असे तुमचे शब्द आहेत”, अशा शब्दांत न्यायालयाने रणवीर अलाहाबादियाचा समाचार घेतला.
“इंडियाज गॉट लेटेंट’ या यूट्यूब शोमध्ये आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल अनेक एफआयआरच्या संदर्भात पॉडकास्टर रणवीर अलाहाबादियाला सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले. न्यायालयाने अलाहाबादियाच्या टिप्पण्यांचा निषेध करत म्हटले की, “या व्यक्तीच्या मनात कचरा भरला आहे. तुझे शब्द पालकांना आणि बहिणींना लाज वाटतील असेच आहेत. संपूर्ण समाजाला याची लाज वाटेल.”
पासपोर्ट जमा करण्याचे आदेश
न्यायमूर्ती सूर्यकांत आणि एन. कोटीश्वर सिंह यांनी अलाहाबादियाला त्याचा पासपोर्ट ठाणे पोलिस स्टेशनमध्ये जमा करण्याचे निर्देश दिले आणि न्यायालयाच्या पूर्व परवानगीशिवाय त्याला भारत सोडण्यास मज्जाव केला आहे.
दरम्यान त्याने त्याच्या विधानाबाबत माफी मागितली असली तरी त्याच्यावर सर्व बाजूंनी टीका होत आहे.