सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांनी आपली मालमत्ता सार्वजनिक करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचाही समावेश आहे. याअंतर्गत, न्यायाधीशांनी यापूर्वी सरन्यायाधीशांसमोर सादर केलेली मालमत्तेची माहिती आता सर्वसामान्यांसाठी खुली केली जाणार आहे.
१ एप्रिल रोजी झालेल्या पूर्ण न्यायालयाच्या बैठकीत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. याआधी ही प्रक्रिया पूर्णपणे ऐच्छिक होती आणि मालमत्तेची माहिती फक्त सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर अपलोड केली जात असे. मात्र, आता ही माहिती सार्वजनिक स्वरूपात आणि अनिवार्यपणे प्रसिद्ध केली जाणार आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयातील एकूण ३० न्यायाधीशांनी आपली मालमत्ता जाहीर केली आहे. यामध्ये न्यायमूर्ती बी.आर. गवई, सूर्यकांत, अभय एस. ओक, जे.के. माहेश्वरी, बी.व्ही. नागरथना यांचा समावेश आहे.
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी आगीदरम्यान मोठी रोख रक्कम सापडल्याचा आरोप झाला आहे. १४ मार्च रोजी त्यांच्या अधिकृत निवासस्थानी लागलेल्या आगीदरम्यान, अग्निशमन दलाने स्टोअर रूममध्ये नोटांचे गठ्ठे आढळल्याचे समोर आले. यामध्ये काही नोटा आगीत जळाल्या असल्याचेही सांगितले जात आहे.
या प्रकारानंतर २२ मार्च रोजी सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी तीन सदस्यीय अंतर्गत चौकशी समिती गठीत केली. या घटनांच्या पार्श्वभूमीवर मालमत्तेची पारदर्शकता राखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.