केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्गांवरील टोलच्या किंमती नव्याने लागू करण्यासाठी तयारी सुरु केली आहे. केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी लवकरच सरकारतर्फे नवं टोल धोरण आणलं जाणार असल्याचं जाहीर केलं.
नव्या टोल धोरणानुसार ३ हजार रुपये वार्षिक तर ३० हजार रुपये १५ वर्षांसाठी अशा प्रकारे दर आकारणी करण्यात येणार आहे. यासाठी एकदाच पेमेंट करावं लागणार आहे. राष्ट्रीय महामार्गांवर हे टोल नव्या दरात येतील. सामान्यांच्या खिशाला परवडतील असे टोल आणण्याची तयारी सरकारकडून केली जाते आहे.
राज्यसभेत नितीन गडकरी यांनी एका प्रश्नाला उत्तर देत असताना टोलबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. सध्याच्या घडीला रस्ते निर्मितीवर सरकार भरपूर खर्च करतं आहे. त्यामुळे टोल टॅक्स हा आवश्यक भाग आहे. मात्र लोक मोठ्या प्रमाणावर रस्त्यांचा, महामार्गांचा वापर करतात त्यामुळे त्यांना दिलासा देण्यासाठीही आम्ही या धोरणात विचार करणार आहोत. भारतात टोल टॅक्सचं कलेक्शन हे आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ६४, ८०९.८६ कोटी रुपयांपर्यंत पोहचलं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे कलेक्शन ३५ टक्क्यांनी वाढलं आहे अशीही माहिती नितीन गडकरींनी दिली.