केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. शनिवारी ते रायगड किल्ल्याला भेट देणार आहेत. त्यानंतर मुंबईत त्यांचे कार्यक्रम आहेत. रायगड किल्ल्यावरील कार्यक्रम आटोपल्यानंतर ते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांच्या सुतारवाडी येथील निवासस्थानी भोजनाला जाणार आहेत. त्यामुळे अमित शाह यांच्या या दौऱ्यात रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा वाद देखील सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास त्यांचे पुणे येथे आगमन होईल. त्यानंतर शनिवारी सकाळी साडेदहा वाजता पाचाड येथे राजमाता जिजाउंच्या समाधीचे दर्शन घेतील. नंतर 11 वाजता ते रायगड किल्ल्याला भेट देतील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला ते वंदन करतील. नंतर किल्ल्यावर त्यांच्या उपस्थितीत काही कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. अमित शाह दुपारी दोन वाजता सुतारवाडी येथील सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत. दुपारचे जेवण ते तटकरेंच्या घरीच करतील. त्यानंतर साडेतीन वाजता अमित शाह यांचे मुंबईत आगमन होईल. मुंबईत साप्ताहिक चित्रलेखाच्या विलेपार्ले येथील कार्यक्रमास त्यांची उपस्थिती असणार आहे. रात्री ते सह्याद्री अतिथि गृह येथे येतील. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद अजून काही मिटलेला नाही. या दौऱ्यात तो सुटण्याची शक्यता आहे.