विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करून भारताचं नाव उंचावलंय, तेव्हा त्याला भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न दिला जावा अशी मागणी माजी क्रिकेटर सुरेश रैना याने केली आहे.
भारत – पाकिस्तान तणावामुळे स्थगित करण्यात आलेली आयपीएल 2025 ही स्पर्धा १७ मे पासून पुन्हा सुरु करण्यात आली. यावेळी स्पर्धेतील ५८ वा सामना हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात खेळण्यात आला. यादरम्यान कॉमेंट्री बॉक्समध्ये असणाऱ्या माजी क्रिकेटर सुरेश रैनाने विराट कोहलीला भारतरत्न पुरस्कार दिला जावा अशी मागणी केली. सुरेश रैना म्हणाला की, ‘विराट कोहलीने त्याच्या करिअरमध्ये जेवढ्या उपलब्धी मिळवल्या आहेत आणि भारत तसेच भारतीय संघासाठी त्याने जे काही योगदान दिलंय त्यासाठी त्याला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करायला हवे. भारत सरकारने त्याला भारतरत्नहा पुरस्कार द्यायला हवा’.