वर्ल्ड चॅम्पिअन डी गुकेशने (वर्ल्ड नंबर ५) नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत सहाव्या फेरीत वर्ल्ड नंबर १ खेळाडू मॅग्नस कार्लसनला पराभूत केलं. गुकेशचा क्लासिकल चेसमधील मॅग्नस कार्लसनविरोधातील हा पहिला विजय आहे. या विजयासह १९ वर्षीय डी गुकेश नॉर्वे बुद्धिबळ २०२५ च्या गुणतालिकेत ८.५ गुणांसह तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. कार्लसन आणि अमेरिकन ग्रँडमास्टर फाबियानो कारुआना ९.५ गुणांसह संयुक्तपणे पहिल्या स्थानावार आहेत. पराभवानंतर कार्लसनने चेस बोर्डवर जोरात हात आदळल्या नंतर गुकेशशी हस्तांदोलन केलं आणि मीडियासोबत काही न बोलता निघून गेला. दरम्यान या पराभवानंतर त्याने आपली पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
विद्यमान विश्वविजेत्याची ऊर्जा आणि लढण्याची वृत्ती यामुळे त्याला विजय मिळाला असं कौतुक त्याने केलं आहे. अन्याथा सामान्य दिवशी आपण स्पर्धा जिंकलो असतो असा विश्वासही त्याने व्यक्त केला आहे. पराभवानंतर कार्लसनच्या चेहऱ्यावर अविश्वास आणि निराशा पसरली होती.
“मी स्वतः त्या वयाचा होतो हे मला आठवत आहे. कधीकधी तुमची ऊर्जा, लढाऊ वृत्ती, आणि आशावाद तुमच्या चालींच्या गुणवत्तेपेक्षा मोठा असतो,” असं कार्लसन म्हणाला. “मला वाटतं, बराच काळ तो (गुकेश) कमी-अधिक प्रमाणात आंधळेपणाने प्रयत्न करत होता. सामान्य दिवशी मी तो सामना जिंकतो आणि गोष्टी अगदी वेगळ्या दिसल्या असता,” असंही पाच वेळा जगज्जेत्याने पुढे म्हटले.