राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील महायुती सरकारचं दुसरं विधिमंडळ अधिवेशन होत असून अद्यापही राज्यात विरोधी पक्षनेतेपदावर कोणाचीही वर्णी लागली नाही. विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी महाविकास आघाडीमधील नेत्याची नियुक्ती करावी, अशी मागणी विरोधकांकडून होत आहे. मात्र, अद्यापही त्याबाबतच निर्णय झालेला नाही. त्यामुळे, आज पुन्हा एकदा विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीवरुन सभागृहात गोंधळ झाल्याचं दिसून आलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल शिवसेना उबाठा पक्षाच्या आमदारांना दिलेल्या सूचनेनुसार आज पुन्हा एकदा विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा समोर आणण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार, महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं, त्यांनी सभागृहाबाहेर घोषणाबाजीही केली.
विधानभवनात आज सकाळी विरोधी पक्षनेते पदाबाबत महाविकास आघाडीतील आमदारांची बैठक पार पडली. त्यामध्ये भास्कर जाधव, अजय चौधरी, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड विजय वडेट्टीवार, सतेज पाटील हे आमदार उपस्थित होते. या बैठकीनंतर विरोधी पक्षनेते पदाचा मुद्दा सभागृहात मांडण्याचा निर्णय घेण्यात आला. विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय कधी घेणार? हा प्रश्न विधानसभा अध्यक्षांना सभागृहात विचारण्यात आला. त्यावर, आपल्या दालनात यावर चर्चा झाल्याचे विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं. तसेच, ठरल्याप्रमाणे विरोधी पक्षनेते पदाबाबत विधानसभा अध्यक्षांचे उत्तर महाविकास आघाडीतील आमदारांना रेकॉर्डवर मिळालं. याच मुद्द्यावरुन विरोधी पक्षाचे आमदार आक्रमक झाले होते. तसेच, लवकरात लवकर विरोधी पक्षनेतेपदाची निवड करण्यात यावी, अशी मागणीही आमदारांनी केली.