ईदच्या दिवशी रस्त्यावर नमाज पढण्यास मनाई करण्यात आल्यानंतर त्यावरून बराच वादविवाद झाला. उत्तर प्रदेशच्या मेरठनंतर इतरही ठिकाणी अशाच प्रकारचे आदेश पारित करण्यात आले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या आदेशांचं समर्थन केलं आहे. ‘रस्ते चालण्यासाठी असतात’, असं म्हणत योगी आदित्यनाथ यांनी हिंदूंकडून शिस्त शिकण्याचा सल्ला दिला आहे.
योगी आदित्यनाथ यांची पीटीआय वृत्तसंस्थेनं सविस्तर मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये योगी आदित्यनाथ यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यात मेरठमध्ये घडलेल्या प्रकाराबाबत त्यांना विचारणा करण्यात आली. मेरठमध्ये रस्त्यावर नमाज पढण्यास मनाई करण्यात आली होती. तसेच, अशी स्थिती दिसल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला होता. यावर काही आक्षेप घेण्यात आल्याबाबत विचारणा केली असता त्यावर योगी आदित्यनाथ यांनी ही भूमिका मांडली.
योगी आदित्यनाथ यांनी मेरठ प्रशासनाने जारी केलेल्या आदेशांचं समर्थन केलं. “मेरठमध्ये जे आदेश निघाले ते बरोबरच आहेत. रस्ते चालण्यासाठी असतात. जे लोक हे बोलत आहेत, त्यांनी हिंदूंकडून शिस्त शिकायला हवी. प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्यासाठी ६६ कोटी लोक आले होते. कुठेही लुटमार, हल्ले, छेडछाड, तोडफोड, अपहरण असले प्रकार झाले नाहीत. ही आहे धार्मिक शिस्त. लोक श्रद्धेनं आले, महास्नान केलं आणि आपापल्या घरी परतले”, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.